शाईपेन...!
तीन..
मला आकर्षण असायचं ते पारदर्शक काचेच्या पेनाचं. त्याच्यामधून आरपार दिसणाऱ्या
शाईचं..! पण हे वादाचे मुद्दे होते, निवडीचा हक्क मुलांना असं समीकरण फारसं नव्हतं!
पण हे कधी बालक आणि पालक यांच्यातले वादाचे मुद्दे झाले नाहीत.
कित्येक वेळा लिहिता लिहिता पेनाची निब तुटायची,
ती बदलणं हे काम सुरुवाती सुरुवातीला जिकिरीचं वाटणारं, नंतर अगदी सराईतपणे
व्हायचं. त्यावेळेला पेनाच्या पुढचा उघडा बोडका भाग बघताना जादू आहे असं वाटायचं. तुटणारी
नीब यासोबतच गळणारं पेन हि आणखीन वेगळीच समस्या... बऱ्याच वेळा चांगल्या न आलेल्या
अक्षरासाठी या पैकी काहिही किंवा खुद्द पेनच जबाबदार ठरवलं जायचं.
एक मोठी गम्मत मला आठवतेय.. ती म्हणजे पेन बिघडलय, खराब झालय असं वाटलं की भरपूर
आनंद व्हायचा. एखादा किल्ला सर केल्याच्या आवेशात हे घरात सांगितलं जायचं पण त्याची
पालकांकडून खातरजमा व्हायची. तिथे मात्र मला पेन नेहमी एखाद्या चुकार लहान मुलासारखं
वाटायच. त्याचं बिनसलंय, ते खराब झालंय असे म्हणताच वडील, काही चिठोऱ्या, कागद पुढे
करून सांगायचे... हं लिहून दाखव...! तेंव्हा नंतर, किती वेळा लिहिता लिहिता बंद पडतं,
शाई शिंपडावी लागते, रेघोट्या ओढाव्या लागतात अशी तक्रारीची अखंड टकळी चालू असतानाच
तेच ते बिघडलेलं पेन सरळ सरळ दल बदलून वडिलांच्या गटात सामील होऊन त्यांचा धाक असल्या
प्रमाणे सुतासारखं सरळ लिहायला लागायचं. त्याच्या कडे अतिशय मोठ्या अविश्वासाने बघताना
आणि पुन्हा वडिलांकडे मी अतिशय खरं सांगतेय या आविर्भावाने बघताना गोंधळून त्रेधातीरपीट
उडायची आणि पेनाचा इतका म्हणून राग यायचा! असे त्यावेळेसही आणि अजूनही मला वाटते कि
ते खोडकर, हसत पुन्हा कम्पासात विराजमान होताना म्हणायचं... कशी जिरवली.. !!
पण मग अचानक अगदी न मागता एखादं नवीन पेन जेव्हा आणून दिलं जायचं, तेव्हा मात्र
या जुन्याच पेनाबद्दल ओढ वाटायची. त्याला आपल्या शालेय दिनक्रमातून बाहेर टाकण्याची
कल्पनाही सहन व्हायची नाही. परंतु कधीतरी नवीन हे जुन्याने बदललंच जायचं आणि मग जुनं
पेन खोलीतल्या एका कोपऱ्यातल्या कप्प्यात, सर्व जुन्या पेनांसाठी केलेल्या खास जागेमध्ये
,शांतपणे जीर्णशीर्ण म्हाताऱ्या माणसाप्रमाणे, त्याच्या इतर सवंगड्यां-सोबत पडून राहायचं.
रोज त्याच्या कडे न चुकता बघणे, त्याला साफ करून ठेवणे हे अनंत काळापर्यंत चालायचं.
आणि ते अडगळीत जाऊ नये अशी पुरेपूर काळजी घेतली जायची. काहिही झाले तरी कित्येक निबंध
स्पर्धा, हस्ताक्षर, शुद्धलेखन स्पर्धा आणि परीक्षा यांचं ते वादातीत साक्षीदार आणि
साथीदार..! कुणाचेही अस्तित्व इतक्या पटकन नाकारणे आणि त्याची जागा दुसऱ्या कुणीतरी
घेणे हे तेंव्हाही शक्य नव्हतं आणि आताहि नाही.....!
नवीन पेन ऐटीत कम्पासात बसायचं. त्याची ओळख सगळ्यांना करून द्यायची आहे आणि ते
छान पैकी मिरवायचे आहे याच विचारात दुसरा दिवस कधी एकदा उजाडतो याची वाट पहात कधीतरी
झोप लागायची आणि मग स्वप्नात.... सगळे जुने पेन, रेषांचे, रंगीत, फेर धरून नाचायचे
आणि मध्यभागी मान वर करून टेचात उभं असायचं नवीन कोरे पेन..!