आनंदाचे डोही ..!
‘Happiness is ‘.... हे , ते ,बरंच काही बाही! कोणासाठी उशिरापर्यंत झोपणं,
कोणासाठी सोमवारी अचानक सुट्टी मिळणं, कोणासाठी मनसोक्त हुंदडण, तर कोणासाठी आणखी
काही. म्हणजे काय आहे सध्या social networking च्या जमान्यात तर बहुतेक मंडळी आपापला आनंद खूप छोट्या छोट्या पण त्या
क्षणासाठी, किंवा त्या विविक्षित व्यक्तीसाठीच्या गोष्टींमध्ये शोधताना दिसतात.
मजा येते अशा गोष्टी वाचायला , बघायला, आणि हेही लक्षात येतं कि खूप काहीतरी
मिळवल्यानंतरच आनंद व्हावा , किंवा तो जाहीर करावा असा काही नियम नाहीये किंवा अशा
काही अलिखित नियमाच्या विरोधातील हे मजेशीर बंड नक्कीच सुखद आहे. “Keep it
simple silly “ असं म्हणत म्हणत आपण आयुष्य आणि जगणं दोन्हीही बदलतोय. पण हे खरंच इतक्या सहजतेचं
आहे कि केवळ आपल्या सोईच्या गोष्टींसाठीच तर सहज, सोप्पं वागतोय असं तर नाही ना..!किंवा
काही नकोसे विषय, भावना किंवा नाती टाळण्याची हि पळवाट आहे का ..!??
अचानक मला का असे प्रश्न पडले , तर सांगते ..
आनंदाची व्याख्या हि खरेतर ज्याची त्याची वैयक्तिक.
म्हणजे सामुहिक प्रकारे आनंद मिळवण्याचे लौकिकार्थाने रुजू झालेले काही प्रकार वगळता
, आनंद म्हटलं कि तो माझा –माझा असं थोडंफार तरी चित्र नक्कीच दिसतं. पण मला आनंद
होतो म्हणजे नक्की काय होतं? छान वाटतं, समाधानी वाटतं कि आपण राग न येणे , चिडचिड
न होणे , वैताग न वाटणे , किंवा साधारणच
बोअर न होणे या स्थितीला आनंद म्हणतो..!!?
पडला ना प्रश्न..!
पडलाच पाहिजे. साधारण वैचारिक लोकांना तरी
नक्कीच!
मला अगदी मागच्या काही दिवसांपूर्वी एक अतिशय दुर्मिळ
संधी मिळाली. मी दुर्मिळ याचसाठी म्हणते कि मला खात्री आहे कि हे वाचणाऱ्या कमीत
कमी ८० % लोकांना तरी अशी संधी नक्कीच मिळाली नसणार..! ती म्हणजे ,एका प्रतिष्ठित
ठिकाणी, तितक्याच काही प्रतिष्ठित लोकांपुढे माझ्या स्वतःच्या कामाविषयी किंवा
विषयाविषयी सादरीकरण करण्याची. पण यात विशेष
असे काय ? नक्कीच काहीच नाही. हि तर आता अतिशय सर्वसामान्य बाब झालेली आहे. पण विशेष
असे कि हे सादरीकरण करताना माझी स्वतःची आई त्याठिकाणी उपस्थित होती! त्याचं काही मंडळींच्या समवेत तीही लक्षपूर्वक
माझी डॉक्टर असलेली लेक काय आणि कशी बोलत आहे हे मनापसून ऐकत होती ! अगदी पापणीही
न लवू देता. बर तिला इंग्रजी या विषयाचे सोयारेसुतकही नाही. मी काय विषय मांडतीये
हे हि तिला कदाचित कळले नसते , परंतु मी दाखवत असलेल्या slides वरून तिने संदर्भही लावले होते आणि अंदाजही बांधले होते ,
कि मी काय बोलतेय , कशाविषयी बोलतेय. जेंव्हा सादरीकरण पूर्ण झालं तेंव्हा झालेला
टाळ्यांचा कडकडाट यापेक्षा माझ्याही नकळत मी तिच्या तिथल्या उपस्थितीने खरेतर
भारावून गेले होते. अचानक डोळ्यांसमोरून शाळेतले दिवस तरळून गेले .
माझं माध्यम मराठी. त्यामुळे माझा अभ्यास बहुतेक
वेळा माझी आईच घ्यायची. अभ्यासापेक्षा माझ्या सर्वांगीण विकासाकडे तिचे पूर्ण लक्ष
असायचे. अगदी बालवाडीत असल्यापासून सुरुवातीला तिच्या इच्छेमूळे, आणि नंतर तिने
नेटाने घेतलेल्या परिश्रमांमुळे, वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा , नाटक,
उस्फुर्त भाषणे , चर्चा , संवाद इत्यादी अनेक प्रकारात आवड निर्माण झाली आणि त्यामुळे कोणतीही
स्पर्धा असो अथवा इतर काही ते गाजवायाचंच अशी उर्मी हि निर्माण झाली आणि पुढे पुढे त्याची
सवयही . आईचं या सगळ्यांसाठी सराव करून घेणंही किती सवयीचं झालं होतं हे तेंव्हाच कळालं
जेंव्हा माध्यम मराठी मधून इंग्रजीत बदललं गेलं , आणि आता केवळ स्वतःवर विसंबून राहण्याशिवाय गत्यंतर न्हवतं..! पण त्याचीही सवय
तिनेच लावली होती. घट्ट पकडून ठेवलेला हात कधीच मोकळा सोडून तिने आत्मविश्वासाने
मला माझ्याही नकळत खूप पुढे जाऊ दिले होते. तिच्याही पुढे , तिच्या माझ्या नात्याच्याही
पुढे , आईमध्ये असणाऱ्या स्त्रीसुलभ काळजी च्याही पुढे , आणि कित्येक बुरसट
संकल्पना आणि विचारांच्या पुढे . तिच्यासोबत कधीही गुदमरलं नाही मला. पुढे मी माझं
क्षेत्र निवडलं, जोडीदार निवडला , प्रत्येकाची मुभा दिली तिने. एक माध्यम बदलले मात्र बऱ्याच गोष्टी बदलल्या.
माझं असं विश्व तयार झालं,होऊ लागलं. आणि यामध्ये बरीच वर्षे माझ्याकडूनही त्याच
त्याच चुका घडल्या ... आपल्या घरतल्या मंडळींना गृहीत धरण्याच्या..! यामध्ये
दुर्दैवाने वरचा क्रमांक अर्थातच आईचा ! दुर्दैवाने सोयीस्कर रित्या माझा खरा
जोडीदार असणारी आई , मला सर्वार्थाने समजून घेणारी आई अचानक मला अडचण वाटू लागली ,
तिचे विचार ,तिची काळजी अनाठायी आहे असे वाटू लागले. तिचे बोलणे टोचू लागले ,
नकोसे वाटू लागले. आणि मग मीही ‘happiness is ..’ या जगातील एक आत्मकेंद्री व्यक्ती बनले. सुदैव इतकेच ,
तिचे माझ्यावर असणारे संस्कार असतील किंवा माझे असणारे शिक्षण आणि वाचनातून आलेले
वैचारिक धन यापैकी कशानेही किंवा प्रत्येकाला असणारी सद्सद्विवेकबुद्धी कदाचित..या
फसव्या जगातून माझी मात्र लौकर सुटका झाली..! मग मात्र मी कायमचीच खुणगाठ बांधली ,
कि शक्य तितके मी यांना दुखावणार नाही , आईला तर नाहीच नाही. पण आजही नकळत बऱ्याचवेळा
ती माझ्याकडून दुखावली जाते , फरक इतकाच कि त्याची तीव्रता आता उरलीच नाही..!
पण त्यादिवशी जेंव्हा
माझी आई अभिमानाने माझ्यासाठी उभी राहून टाळ्या वाजवून , माझे कौतुक करत होती
तेंव्हा मात्र मला मी आत्ताच कथाकथन स्पर्धेत उत्तम कथा सांगून पळत –पळत आईकडे
जाणार आहे असं खूपच प्रकर्षाने आतून वाटलं , आणि त्याचं क्षणी मी जगातील अतिशय मोजक्याच
सुदैवी लोकांपैकी एक असल्याची जाणीवही झाली. वयाच्या चौतिसाव्या वर्षी जर आईकडून
पावती मिळत असेल तर यापेक्षा नक्कीच कोणताही मोठ्ठा आनंद नाही असा साक्षात्कार
म्हटला तरीही चालेल, पण मला झाला..! आणि मग मात्र आनंद म्हणजे काय आणि तो नक्कीच वैयक्तिक
नाही हे कायमचं आणि पूर्ण समजल . मला नाही वाटत कि मला जे काही त्यादिवशी गवसलं ते
कधीही हिरावून घेण्यासारखं आहे. ते खूप दुर्मिळ आहे. मला हेही माहित आहे, कि हि
संधी फारशी कोणाच्याही वाट्याला चालून येत नाही. त्यादिवशी आणि आजही स्वतःविषयी
सार्थ अभिमान वाटला. त्यामुळे आई हे फक्त तुझ्यासाठी ..!!!
उर्जिता