Thursday 12 January 2017

गोष्ट एका राणीची...!

गोष्ट एका राणीची...!
आटपाट नगर होतं, आटपाट नगरच्या अगदी आत, एक अतरंगी राजा होता. राजाच तो..खूप राजबिंडा! बरचसे फेअरनेस क्रीम लावून, डीटॉक्स डाएट करून, चकाकणारी त्वचा, त्याच्या राजस स्वरूपाला शोभेल अशी छोटीशी गोटी दाढी! केस मानेवर रुळायचे, वाऱ्याने भुर-भुर हलायचे.काय ते विविध रंग आणि काय त्या छटा! सोनेरी म्हणू नका, लाल म्हणू नका , हिरवा म्हणू नका, आपल्या राजाला कोणत्याच रंगाचं, ना वावडं, ना तिरस्कार, सगळे कसे एका माळेत राजाच्या केसांवर विराजमान..! कौतुकाने हात फिरवायचा, कुरवाळायचा,कधीतरी, बुचडाही बांधायचा..! राजेपणाला शोभेल अशीच शरीरयष्टी, पटकन पाहणाऱ्याला एखादा हॉलीवूड नट किंवा ग्रीक गॉड आठवलाच पाहिजे. भरीस भर म्हणून काळेशार सतत भिरभिरणारे डोळे!   
अशा या राजाची व्यायामशाळा पण लय भारी बरंका!सगळं कसा चकाचक –टापटीप! तिकडे राजा अगदी रोज जायचा. कसलीशी वेगळ्याच भाषेतली(आंग्ल, फ्रेंच इत्यादी..) गाणी मन लावून मोठ्यांदा ऐकायचा, आणि काय सांगायचं हो.. प्रजेसाठी खूप घाम गाळायचा! आजुबाजूलाच असायची सारी प्रजा..नजर ठेवून याच्यावर!
आता प्रजा कोणाची.. महराजा?..याचीच..!(प्रजा म्हणजे नेमके कोण,हे ज्याचे त्याने समजून घेतलेले बरे!)
कधी राजा, त्या व्यायामशाळेच्या समोर असणाऱ्या निळ्याशार तलावामध्ये डुंबत राहायचा तासंतास. जलक्रीडा..! त्याचा आवडता छंद! विशेषतः या इथे असणाऱ्या गणिकांच्या सहवासात. राजाच्या भरदार शरीराकडे बघून, कित्येक जणी हाय,..तिथेच  फिदा व्हायच्या..! तोकड्या तलम कपड्यात राजाच्या अवतीभवती वावरायच्या, सुंदर सुंगंधी अत्तरं लेऊन, त्याच्याकडे नजरेचे बाण फेकायच्या. नजरांची, इशाऱ्यांची देवाण-घेवाण होई, राजा मनोमन खुष होई! गालावरची खळी आणि त्याची रांगडी छाती दाखवत तसाच निथळत तलावाच्या बाहेर येई. जालक्रीडेचा आनंद घेऊन..!
चौफेर एक नजर टाकी..आणि दमदार पावले टाकीत महालाकडे रवाना होई..!
......................................................................................................................
राजमहाल, नजरेच्या दृष्टीस आला की राजा अभिमानाने फुगत असे. प्रशस्त, विस्तीर्ण आणखीन देता येतील तितकी विशेषणे असा राजमहाल. आत मध्ये सगळं कसं आखीव-रेखीव. बगीचा, कारंजी, महत्वाचं म्हणजे कित्येक दास-दासी दिमतीला. अगदी महालाच्या दरवाजापासून,ते त्याच्या अंतःपुरा पर्यंत!
अंतःपूर..राणीचे साम्राज्य........!
बर,आपल्या गोष्टीत राजाला राणी एकच हं,आवडती! नावडतीचा प्रश्नच नाही,आणि बाकीच्यांचा हिशेब न केलेला उत्तम. या राजाची राणी माहितीये का कशी होती? अत्यंत रूपवान, तितकीच बुद्धिमान आणि राजकारणातही निपुण. राजाला सर्वतोपरी साजेशी,अगदी पट्टराणी! हो राजाला असे म्हणावेही लागे. राणीसमोर इतरांविषयी बोलायची त्याची काय बिषाद!
आपल्या राणीचा सुद्धा थाट निराळाच. राणीचा दिवस बऱ्याचदा राजासोबतच सुरु होई, परंतु राजमहालातच. तिचा चेहरा म्हणजे एक कोरीव शिल्पच जणू! तिचा केशसंभार राजाच्या अर्धाच, अगदी जेमतेम मानेपर्यंत,पण काय नीटस. तिला मात्र एकच रंग आवडायचा, सोनेरी,वैभव दाखविणारा! त्याच्या बटा इकडे तिकडे मिरवीत राणी अक्षरशः चार फुट जमिनीवरूनच चालायची! हो,कारण तिच्या स्टीलेटोज ची उंचीच ६ इंच, महालातही घालूनच फिरायची, दास दासींना हुकुम सोडत,आणि अधे-मधे स्वतःची नखे रंगवत. राणीच्या छातीवर एक छान गोंदण, अहो टॅटू आपला! तिच्या खास कपड्यांमधून तो कायम अर्धवटसा डोकावत राही. तिच्या बुद्धिमान चेहेऱ्याला, तिचे अपरे नाक अगदी शोभून दिसे. विशाल कपाळावर तिच्या झुलणाऱ्या बटा ती मानेच्याच एका झटक्याने बाजूला सारी, तेंव्हा तिच्या अतिशय गुढरम्य अशा डोळ्यांचे दर्शन घडे, जिथे नजर मात्र, कायम करारी! देवदत्त सौंदर्याबरोबरच तलवार बाजी, घोडेस्वारी या सर्वांमध्ये ती अगदी सरस!
सगळं कसं बरं होतं आटपाट नगरात.. सुखी.. अगदी सुखी. दृष्ट लागले इतकं सुखी..!
एकच दुःख काय ते..राजाची स्वतःची मात्र प्रजा नव्हती अजून..!(हो,सुज्ञ वाचकांनी ओळखलं असेलच,कथा इकडेच जातीये म्हणून..!)
राजा-राणी एकत्र राहायचे..त्याला १० वर्ष झाली..! लग्न बिग्न नाही लीव-इन रिलेशनशीप! पण राजाला छोटासा राजकुमार किंवा राजकुमारी असं काहीच नव्हतं. अर्थात राणीला टेक्नीकली!  
 हा विषय कधी कधी दोघांमध्ये वादाच्या ठीणगीसारखा असायचा. कोण बोलणार म्हणून दोघेही हसत राहायचे,विषय बदलत, टाळत राहायचे.आटपाट नगरात,त्याच्या ऐश्वर्यात रमत राहायचे.
....................................................................................................................................
एके दिवशी काय झालं? एका भर दुपारी,राणी अचानक अवेळीच राजवाड्यात आली. डोकं दुखतंय म्हणून दासींना बोलावू लागली. लॅपटॉप भिरकावला, तिची आयुधं टाकली, आणि दिले झोकून स्वतःला  मंचकावर,गोड गोड,गुबगुबीत गादिवर.
राणी विचार करू लागली.
राजाच्या राजबिंड्या स्वरुपाआडची एक गोष्ट तिला खरेतर बरेच दिवस खुपत होती,तिच परत समोर येऊन उभी राहिली. तिचे आणि राजाचे एकांताचे क्षण..
ज्याला आता एकांत म्हणावे का? हाच खरा प्रश्न. अगदी क्वचितच ती दोघे तशी भेटत असत. राणीचे राजावर खूप प्रेम, तसेच राजाचे देखील, परंतु त्यात आता शारीरिक जवळीक, उत्सुकता, फारशी उरली नव्हती.एकदा मैत्रिणींमध्ये बोलताना राणी असे म्हणाली  
We can pass as siblings, especially the way we maintain our celibacy!”
अगदी भावा-बहिणीसारखे राहतो आम्ही..!
 तिला ते आठवले मात्र, त्याही अवस्थेत तिला मनापसून हसू आले. इकडे दासी तिचे डोके चेपून देत होती, हळुवार पणे केसांमध्ये हात फिरवीत होती...
राणीचे कटू सत्य तिच्या समोर होते.राजा आणि ती आता शय्यासोबत करीत नसत, कित्येक वेळेला ती स्वतःच ते टाळत असे. आणि कित्येक वेळेला राजा. निरसता, केवळ तेच उरले होते आता. नात्यामधल्या या शत्रूशी जमेल तसे लढूनही बघितले होते! नाही, राजाच्या बाबतीत तिला काही-बाही ऐकिवात आले होते म्हणून नक्कीच नव्हे! अशा बऱ्याचशा बाबी कानावर येऊन देखील, ती त्या बाबतीत मात्र अतिशय कूल असायची. अगदी सहजतेने घ्यायची. तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी महत्वाचा भाग म्हणजे तिचा ब्रॉड माइंडेड अॅटीट्युड. व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर, आणि निकड या दोन्हीही गोष्टी ती जाणून होती. पण ती वैऱ्याची रोजची रात्र मात्र तिला खायला उठायची, खूप वेळा या संदर्भात संवाद साधण्याचा तिने प्रयत्न केला, पण छे,काहीच झाले नाही, अशा थाटात राजा मात्र निवांत. हं, मात्र संततीसाठी त्याचे अखंड प्रयत्न आणि राणीमागे ससेमिरा मात्र सुरूच होता.राणीला स्वतःला संतती हवीच असणार ,कोणत्या स्त्रीला नको असते,असे त्याने अगदी मनाशी ठरवून टाकले होते. केवळ राजासाठी म्हणून राणीने बरेच उपाय केले, वैद्यबुवा हि झाले, परंतु संतती नाहीच..!  
हे सगळे राणीला त्या मंचकावर पडल्या पडल्या आठवू लागले. तसा तिने एक निर्णय घेतला, “मी आज राजाला स्पष्ट सांगेन, मला नको आहे हे सगळे, हे उपाय, वैद्य,आणि हे संततीसाठी सतत झुरणे..! अगदी निर्धाराने सांगेन. आणि...”,  हा विचार आला मात्र, राणी ताडकन उठली. दासीला वाटले राणीला काही हवे आहे, म्हणून ती अवघडून प्रश्न विचारू लागली, तशी राणी, गोड, मन-मोकळे हसली. दासीला जायला सांगून पुन्हा कामाला लागली, हो, तिने अर्ध्या दिवसासाठी वर्क फ्रॉम होम घेतले होते..!
........................................................................................................................................
 राजा अगदी नेहमीप्रमाणे रात्री महालात दाखल झाला. तो ही आज बराच खुशीत दिसत होता. नजर विचारात हरवली होती, आणि महत्वाचे तो आल्या नंतर लगेच अंतःपूरात वळला. हे थोडेसे वेगळेच, राणी चपापली, सावध झाली. अर्थात तिने त्याचे आगत स्वागत केले, व्यवस्थित.! 
“मी ही लवकर आले आज. बर मी Beer घेतेय, तू घेणारेस? आणि हो मला काही बोलायचंय तुझ्याशी..”
तिने बाकीचे काहीच न बोलता सरळ विषयालाच हात घातला. तो तिचे वाक्य तिथेच तोडत, मानेनेच नाही म्हणाला, राणीच्या अगदी जवळ सरकत, तिचा हात हातात घेत तिच्याकडे खोल पाहत राहिला. राजाने काहीतरी नवेच खूळ डोक्यात घेतले आहे बहुतेक, राणीला जरा अंदाज आला.ती सावध, तरीही त्याला प्रतिसाद देत, पाहत राहिली त्याच्याकडे. राजाने तिला किंचित जवळ ओढले, तिच्या मानेवर आपले ओठ टेकवत, आपले खोल श्वास तिच्या मानेवर रेंगाळत ठेवत, तिला म्हणाला..
I love you a lot..! मला माहितीये की तुही त्याच गोष्टीचा विचार करतेस ज्याचा विचार मी करतो.सगळे, बहुतेक सगळे उपाय झाले, तरीही...... हो म्हणूनच मी एक छान पर्याय काढलाय..आणि तुलाही आवडेल तो, नक्कीच! ”
तिच्या हातातली Beer राजाने केंव्हाच, हळूच बाजूला ठेवून दिली होती.
आता त्याने डोळे मिचकावले (अगदी ठराविक पुरुषी खेळी..!) राणी मनात स्वतःशीच म्हणाली. राजा पुढे काय बोलतोय हे ऐकू लागली, चेहेऱ्यावरचे भाव मात्र अजिबात बदलू न देता. ती त्याच्या सहवासात थोडीशी विरघळली आहे हे अजिबात जाणवू न देता..!
 राजा म्हणाला, “ मी जे सांगतोय ते पूर्ण ऐकून घेशील? माझ्यासाठी? मला माहितीये तू नक्कीच पूर्ण विचार करशील, कोणत्याही प्रकारे घाई-घाईने आपले मत नोंदवणार नाहीस! जे मी बोलतोय ते आपल्या दोघांसाठी, दोघांच्या सुखासाठी..!”
राणीने आपली संयत नजर कायम ठेवत राजाने पुढे बोलावे म्हणून चेहऱ्यावर थोडेसे मंद हास्य आणले, आणि त्याच्या थोडीशी जवळ सरकून ती पूर्ण ऐकू लागली, नाही म्हणायला तिच्या हृदयाचा एक ठोका उगाचच चुकला.
“आपली व्यायामशाळा, आणि तलाव या परिसरात काही दासी आहेत, गणिका...सुंदर ..रूपवान.. म्हणजे तुझ्यापेक्षा कमीच! कित्येकदा मला असे वाटते माझ्यासाठी त्या काहिही करतील..
दोघेही एक क्षण थांबून विचार करू लागले..
राणी : {अच्छा, इतकंच, म्हणजे आता जलक्रिडेचे किस्से सांगणार वाटतं! मी आपलं उगाच...}
राजा: { हे एक बरंच म्हणायचं, हिला बहुतेक काहीच माहित नाही..! आणि असलं तरीही हिची फारशी हरकत दिसत नाही..! Anyway, I need to focus on her right now!}
राणी म्हणाली, “बरं, मग त्या गणिकांच काय..?”
आपली आयाळ कुरवाळत,आपला पुरुषी ताठा सांभाळत, राणीचा अंदाज घेत राजा थोडसं चाचरतच तरीही ठामपणे पुढे बोलला,
“तुला हवा एक राज पुत्र,किंवा एक राजकन्या, अर्थात मलाही. या दासी, गणिकांपैकी ,ठेवतो एखादीला त्याच कामासाठी.  नाहीतरी त्या कधी कामी येतील?”
एव्हाना राणीच्या भुवया उंचावल्या होत्या, पण तरीही फारसं आश्चर्य दिसत नव्हतं, ते बघून अगदी आनंदाने राजा पुढे म्हणाला,
Yes absolutely correct!  I am thinking of surrogacy. Surrogacy with a little twist. म्हणजे बघ, जी कोणी असेल तिला इथेच ठेवू, खाऊ-पिऊ घालू तिला,आणि कालांतराने एका अतिशय छान बाळाचे आई-बाप होऊ..! दासी राहील त्याची दाई म्हणून, कायम. बाळाला सांभाळेल,(आणि मलाही...अर्थात, अहाहा..!)” या शेवटच्या विचाराने राजाला मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या,तसा तो वेगळंच हसला.
राणी नजर तशीच राजाकडे ठेवत किंचित हसली, थोडसं खाकरून, राजाला पुन्हा वर्तमानात आणून, आपला हात त्याच्या हातातून सोडवत उठली.तिची राहिलेली  Beer घेऊन सावकाश मोठ्ठ्या सज्ज्यात येऊन उभी राहिली, बाहेर एकटक बघत! राजा तिला पाठमोरी पाहत राहिला.त्याच्या अपेक्षेनुसार राणी काही दिवस मागून घेईल विचार करायला असे त्याला वाटत होते. सुरुवात तर तशीच झाली.तो मनोमन आपण राणीला किती अंतर्बाह्य ओळखतो या कल्पनेने स्वतःवरच खुश झाला!
राणीने आपली Beer शांतपणे संपवली. पुढच्याच क्षणी ती वळून राजाकडे पाहू लागली, सावकाश त्याच्याकडे चालत येत तिने त्याला आता एक गाढ आलिंगन दिले. त्याच्या छातीवर डोके टेकत आपली पूर्ण संमती दिली. त्याच्या डोळ्यात डोळे मिसळून, त्याच्या छातीवर बोटांनी चाळा करत,त्याला म्हणाली, “हो,अगदी खरं आहे!आणि तुला तर माहीतच आहे, तुझ्या मनातली कोणतीही इच्छा माझ्यासाठी अगदी सर-आंखोपर...!” राजाला हे सारेच अगदी अनपेक्षित होते.तो क्षणभर संभ्रमात पडला. ब्लँक झाला अगदी, पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत त्याने विचार केला, राणी कधीच त्याच्या कोणत्याही निर्णयाच्या आड आली नव्हती हे ही खरेच होते. त्यामुळे सुरुवातीचे राजाचे आश्चर्य मावळून, राजा दोघांसाठीही बऱ्यापैकी अश्वस्त झाला. राणीच्या शेवटच्या नाट्यमय वाक्याने दोघेही खळखळून हसले..!
Beer ची जागा आता Wine ने घेतली, दोघेही कित्येक दिवसांनतर असा निवांत, मोकळा आणि हवाहवासा एकांत अनुभवत होते. वातावरणातील ताण कधीच उडनछू झाला होता.
...........................................................................................................................  
राजा: {“हे एक बरं झालं, राणीला स्वतःच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, राज्यासाठी,वंश पुढे चालविण्यासाठी तिने हे मान्य करणं गरजेचंच होतं,ते तिने केलं यात मला आनंदच आहे!”}
राणी: {“हो का नाही, मी नक्कीच समजू शकते.....!”}
राजा म्हणाला “काय गं, काय विचार करतेस?”
राणी तशीच गोड हासत म्हणाली, “You must be surprised, right? पण मला सांग मग Liberal असणं म्हणजे काय, हेच ना..!?
बस्स, राणीचे ते एक वाक्य आणि राजा सारं काही विसरून, आता केवळ तिच्यामध्ये हरवून गेला!
राणी देखील तशीच हरवून गेली. पुन्हा हे क्षण येणे नाही याची तिला पक्की खात्री होती!
..............................................................................................................................
पुन्हा दुसरा दिवस..राजाची व्यायामशाळा.. पण आज जलक्रीडा नाही,तर आज खास गणिकेचा शोध.
हां हां म्हणता बातमी वणव्यासारखी पसरली. कित्येक, गणिका, अगदी स्वेच्छेने राजाला आपले सर्वस्व बहाल करायला तयार झाल्या. After all he was one rich, handsome, good looking, and spoilt man without any virtue! The deal was lucrative. ‘She, The Queen’ is not his wedded wife! So you never know…!
................................................................................................................................
इकडे राणीने तयारी सुरु केली.तिला नव्या, खास दासीचे आगत स्वागत, अगदी खास करायचे होते. राजमहाल सजवण्यासाठी तिने फतवा काढला. सगळ्या दास-दासी कामाला लागल्या. राणी देखील स्वतः छान तयारी करू लागली. अंतःपुरातील प्रशस्त स्नानगृहातील तिचा बाथ-टब आज पाण्यासोबतच, गुलाबाच्या कोमल पाकळ्यांनी ओत-प्रोत भरून गेला. कित्येक सुवासिक आणि नानाविध बॉडी वॉश, स्क्रब, इत्यादी सारे काही मनसोक्त वापरून तिने आपले शाही स्नान केले. ठेवणीतील उत्तमोत्तम वस्त्रे परिधान केली. त्यावर तितकीच महागडी अत्तरे.सारा आसमंत, राणीच्याच सुवासाने भरून गेला. अत्यंत प्रसन्न मुद्रेने ती जेंव्हा अंतःपुराच्या बाहेर मुख्य महालात आली, तेंव्हा सारे दास-दासी तिच्याकडेच एकटक पाहतच राहिले. पण तिच्या डोळ्यात मात्र, तोच दरारा! आपल्या सर्वात उंची, आवडत्या स्टीलेटोज मध्ये एक- एक पाउल टाकत ती सगळ्या महालाची पाहणी करत होती. सारं काही तिच्या मनाप्रमाणे सजलं होतं. फुलांच्या, दिव्यांच्या कित्येक माळा, पुष्करणी, कारंजी यामध्ये सुगंधी पाणी, त्यावर सोडलेले दिव्यांचे फोकस, जागो-जागी सुंदर रांगोळ्या, अगदी फुलाच्या पायघड्यांसारख्या! येणाऱ्या नवीन दासिसाठी सुद्धा तिने खास दालन तयार करून, सजवून घेतले होते.
      दालनाच्या मधोमध एक भला थोरला मंचक, लाकडावरती,सुंदर, सुबक कलाकुसर कोरलेला.त्याच्या सर्व बाजू तलम, पिवळ्या-लाल पडद्यांनी झाकलेल्या. त्याच्या वरती एक तितकेच कलात्मक झुंबर, सगळे दालन उजळून निघेल इतके दिवे त्यात. समोर एक प्रशस्त आरसा.!(राजाला स्वतःच्याच प्रणय-क्रीडा बघणे नेहमीच जास्त  एक्साईट करत असे !) त्याचबरोबर एक अतिशय मोठा अद्ययावत टी. व्ही., आणि त्याच बरोबर एक ट्राइपॉड  सह व्हिडिओ कॅमेरा,कारण अर्थातच मगाशी सांगितलेलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेड च्या शेजारीच एका प्रशस्त भिंतीवर, अर्धी भिंत व्यापून असलेला बार.त्यात कलात्मकतेने मांडलेल्या विविध प्रकारच्या, आकाराच्या बाटल्या आणि तितकेच विविध ग्लास, असं सारं काही! दालनात रंगसंगती राजाला आवडणारी.त्याच्या वापरायच्या वेगवेगळ्या सपाता, त्याचे कपडे, अशा सर्व अगदी बारीक-सारीक गोष्टी देखील ,काळजीपूर्वक, राणीने स्वतः आपल्या, म्हणजे तिच्या आणि राजाच्या दालनातून इकडे आणून, सजवून ठेवल्या होत्या!  आता राजा आणि येणारी नवीन दासी यांच्या जय्यत स्वागताला ते दालन, तो महाल, स्वतः राणी, आणि सर्व दास-दासी अगदी तयार होते, उत्सुकतेने वाट पाहत होते. आटपाट नगरातल्या, तसेच इतर जवळपासच्या राजे-राजवाड्यांनाही शाही मेजवानीचे आमंत्रण गेले होते, सारे काही अगदी एका दिवसात!
    राणीच्या दोन दासी मात्र काहीशा नाराज, दिसत होत्या. जे चालू आहे ते काही बरोबर नाही. आपली राणी किती मोठ्या अंत:करणाने हे सर्व स्वीकारते आहे याची त्यांना जाणीव होती. त्यातील एक राणीच्या पाठोपाठ तिच्या दालनात गेली देखील, ते रिकामे, ओके-बोके दालन बघून, तिला दाटून आले. आता राणीला सांभाळावे लागेल म्हणून ती राणीकडे पाहू लागली. परंतु राणी, तशीच शांत, धीरगंभीर, तितकीच आनंदी, अगदी लहान मुलीच्या डोळ्यात असतो तसा आनंद ओसंडून वाहत होता तिच्या चेहेऱ्यावरून! आपल्या दुःखी दासीचे दोन्ही हात पकडून ती साऱ्या दालनात फिरू लागली. दासीला एक क्षण वाटले कि राणी वेडी झाली आहे, ती गडबडली, परंतु, राणी मात्र, दालनात मनसोक्त फिरत होती, त्याचा कोपरान्- कोपरा अनुभवत होती! राहिलेच काय होते तिथे आता, राणी, तिची दासी,राणीचे काही महत्वाचे समान आणि तिचा रिकामा पलंग याच्याशिवाय...! राजाचे अस्तित्वच जणू त्या खोलीतून पुसून गेले होते... अगदी शंभर टक्के.. दासी विचार करू लागली,
{हे इतके सहजपणे घेता येते?आपली जीव-भावाची, प्रेम असलेली व्यक्ती अशी दुसऱ्याकडे सुपूर्त करता येते? संपूर्णपणे? आता माझ्या राणीचे कसे होईल?}
अत्यंत व्याकूळ होऊन तिने राणीकडे कटाक्ष टाकला, राणी आपल्या आवडीच्या सज्जात दूर कुठेतरी पहात, मंद हासत अचानक म्हणाली
“अगं मग लिबरल असण्याचा काय फायदा!?”  
जणू काही तिच्या पाठीलाही डोळे होते, आणि दासीच्या डोळ्यातील भाव तिने अचूक वाचले होते. दासी राणीच्या या वाक्या गणिक चपापली. तिच्याकडे गरकन वळून, राणी म्हणाली,
Cake रेडी आहे ना?, आणि हो औक्षण हि करावे लागेल नाही का? ती हि तयारी बघ! Guest-list मी खाली ठेवलीये, त्यानुसार, पुन्हा एकदा सर्वांना reminder दे, बाहेर सर्वांची बसण्याची आणि इतर व्यवस्था तर झाली आहेच, पण तू जातीने, माझी विश्वासू दासी म्हणून लक्ष घाल. त्यात, नक्की, काय समजलीस?”
 पुन्हा तोच दरारा!
दासी लगबगीने, पुढच्या तयारीसाठी निघून गेली. आता गर्दी जमायला सुरुवात झाली होती. नाही म्हणायला इतरेजनात या सोहळ्या विषयी कुतूहल तर होतेच, परंतु सर्वात जास्त राणी विषयी!
    राणी तशीच उभी होती, निवांत, मनमोकळे श्वास घेत..! दालनातील एका प्रशस्त आरशासमोर स्वतःला गर्वाने न्याहाळत..!
......................................................................................................................................
त्या सुन्दर संध्यासमायी, राजाची स्वारी, ऐटीत, दाखल झाली. एका निरतिशय सुकुमार गणिकेसोबत. दास-दासींनी ठरल्याप्रमाणे पुष्पवर्षाव केला. राजाचे वैभव, बघून ती गणिका अवाक झाली. जमलेल्या लोकांमध्ये एकाच हर्षोल्हास चालू झाला. इतक्यात आपली राणी गणिकेला सामोरी गेली, आता मात्र गणिका थोडी कावरी, बावरी झाली, राणीचे सौंदर्य, बघून थक्क झाली. राणीने मनमोकळे हसून, अगदी औक्षण करून तिचे व राजाचे स्वागत केले. केक- शॅम्पेन, सारे काही अगदी ठरल्याप्रमाणे झाले. मेजवानीची रंगत चढू लागली. सर्वांचं हवं-नको राणीने जातीने बघितले. हसून सर्वांना उत्तमोत्तम भेटी दिल्या. मध्यरात्री, कधीतरी, सोहळा संपला, आणि राजा, राणी आणि गणिका आता आपापल्या दालनात जाऊ लागले, तसे राणीने स्वतः दोघांनाही नवीन दालनाकडे नेले. राजा सारी सजावट, राणीची मेहनत बघून अगदी आनंदून गेला. आजही आपल्या पौरुषत्वावर , आपल्यावर राणी किती भाळलेली आहे हे लक्षात येऊन,स्वारी खुश झाली. राणीने दोघांचा निरोप घेतला, आणि ती स्वतःच्या दालनाकडे निघाली. राणीच्या दालनात एक पिआनो होता. ती उत्तम वाजवायची. तिच्या दोन्ही दासी, आता राणीच्या दालनाबाहेर पहारा देत बसल्या होत्या. दोघींनीही राणीला काही हवे का विचारण्यास सुरुवात केली, तेंव्हा राणीने एकाच गोष्ट मागितली, एकांत..पूर्ण एकांत..! जवळपास तासभराने,पिआनो वर सूर उमटू लागले, आणि त्याच्या जोडीला, राजाच्या नवीन दालनात प्रणय रंगास आला..! राणीच्या विश्वासू दासी काहीशा दुःखी अंतःकरणाने चालत्या झाल्या!
.....................................................................................................................................
दुसऱ्या दिवसापासून एका वेगळ्याच दिनचर्येला सुरुवात झाली. आत राजा व्यायामशाळे नंतरची जलक्रीडा विसरला. तो थेट महालात येऊ लागला. नवीन गणिकाहि हळु-हळू रुळू लागली, महालात सुखवस्तू झाली. इतर दास-दासींवर लवकरच हुकुम सोडायला शिकली! राणीचे दालन मात्र वरती असल्यामुळे आणि राणीच्या दाराऱ्यामुळे ती तिकडे फिरकतही नसे.राणीची तशी अट वजा आज्ञा राजाला आणि तिला दोघांनाही   होती. राजानेही ती सहज मान्य केली होती. दिवसेंदिवस, महालातले वातावरण जास्तीजास्त आनंदी होऊ लागले. आता राजा-राणी गोड हसू लागली, एक-मेकांशी जास्त प्रेमाने बोलू लागली. नवीन गणिका मात्र राणीचा मनोमन द्वेष करी, तिला तिच्या आनंदाचे कारण काही केल्या उमजत नसे. राजाला मात्र आताही, राणीचा सहवास कायम हवाहवासा वाटे, इंटलेक्चुअल गप्पांसाठी. ते बगिचात, न चुकता बोलत असत, पण ठरलेला एक तासभरच, तेही राणी म्हणेल तेंव्हा! नाही म्हणायला अजूनही राणीने राजाच्या नाड्या आपल्याच हातात ठेवला होत्या!  इकडे राजाची दासी,अगदी रोज न चुकता शय्यासोबत देई. पण ६ महिने झाले तरी गोड बातमी नाहीच. राजा विचार करू लागला.राजवैद्य झाले तरीही उत्तर सापडेना. दवा-दारू झाले,दासीला योग्य आहार विहार झाले, वेगवेगळ्या ठिकाणी हनिमून झाले, बाबा-बुवा ,गंडे दोरे अगदी सगळे म्हणजे सगळे झाले. दासी पण मग खट्टू होऊ लागली. राजासाठी सगळे बळजबरीने करू लागली. राजाचेही मन आता तिच्यावरून हळुहळू उडू लागले, शेवटी त्याने राणीवर जीवापाड प्रेम केले होते नाहीका..!? परंतु संततीसाठी त्याला प्रयत्न करणेही गरजेचेच होते. गायनेकॉलॉजिस्ट ने सांगितल्या प्रमाणे राजा सारे काही व्यवस्थित करत होता. शास्त्रानुसार, रिपोर्टस् नुसार तर दोघांमध्येही काहीच प्रॉब्लेम नव्हता, शेवटचा पर्याय म्हणून, काही गोष्टी करणे बाकी होते. आता आठ एक महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता. त्यादिवशी नेहमीप्रमाणे, राज-राणी बगिचात भेटले. राणी अतिशय प्रसन्न दिसत होती. राजाची नेहमीचीच राम कहाणी ऐकल्यानंतर, राणीने राजाला सांगितले की तिला दूरदेशी जावे लागणार होते. या गणिकेच्या आगमना नंतर, राणीने स्वतःला मात्र कामात बुडवून घेतले होते. ती आता जास्तीजास्त वेळ महालातच काढी, आपल्या दालनात काम करत. आधे-मध्ये पिआनोचे स्वर मात्र ऐकू येत,परंतु तेही नेहमी आनंदी. राणीला पूर्ण विश्वास होता की राजा-आणि राणीने हाती घेतलेली मोहीम नक्की यशस्वी होणारच..! त्याही दिवशी राजाला तसेच सांगून, ती आपल्या तयारीसाठी निघून गेली. दुसऱ्यादिवशी, भल्या पहाटे, राणी मार्गस्थ झाली. इकडे राजा आणि गणिका यांचे निष्फळ प्रयत्न चालूच राहिले. राजा मात्र राणीला मनोमन मिस करत असे, आणि तिच्या येण्याची वाट पाहत असे. नाही म्हणायला दोघे चॅटींग, इ-मेल, फेस-टाइम, करत असत. राजा, राणीच्या जास्तीजास्त जवळ येऊ लागला, त्याला तिचा सहवास आता सर्व प्रकारे हवा-हवासा वाटू लागला.राणी हे पूर्ण ओळखून होती, त्याला त्याच्या गणिका, जलक्रीडा  कशातच रस उरला नव्हता!
............................................................................................................................................   
 आणि एके दिवशी, राणीने राजाला सांगितले की, ती परत येत आहे. तिला जाऊन साधरण एखाद वर्षाचा कालावधी होऊन गेला होता.
तो दिवस उजाडला.राजा आज,खास राणीसाठी, महालात थांबला. तिच्या स्वागताची जय्यत तयारी करून. सर्व दास-दासींसह, ही गणिकाहि सज्ज झाली, काहीशा निरीच्छेनेच. या वर्षभरात राजाला पूर्ण आपलेसे करता येईल, त्याची राणी म्हणून स्थान मिळवता येईल,या तिच्या मनसुब्यांवर खासच पाणी पडले होते. राणीची स्वारी सरते-शेवटी महालात आली. परंतु हे काय? राणी एकटी आलीच नव्हती, तिच्यासोबत दोन गोंडस बालके! राजा ते बघून अवाक् झाला.त्याच बरोबर महालातील सर्व दास-दासी देखील.
राजाने तरीही पुढे जाऊन राणीचे स्वागत केले, राणीच्या विश्वासू दासींनी बालकांना अतिशय आनंदाने पट्कन आपल्या ताब्यात घेतले. गणिका मुग गिळून गप्प राहिली, आणि आपल्या दालनात रवाना झाली.
सर्वजण जिकडे-तिकडे झाल्यावर, राणीने राजाला गाढ आलिंगन दिले, अर्थात राजा याची कित्येक दिवस वाट पाहत होता, तोही सुखावला.एव्हाना दोघेही महालातील स्टडी मध्ये जाऊन बसले, बाहेर त्या ६-७ महिन्यांच्या बालकांचा आवाज मात्र रेंगाळत होता..!
 स्टडी मध्ये जाता क्षणीच राजाने, राणीला आवेगाने जवळ ओढले, तिच्या ओठांवर आपले ओठ टेकीत म्हणाला, “किती दिवस वाट पाहतोय मी, या एका क्षणाची,आणि काय छान मुलं आहेत ती! कोणाची आहेत? पण जशी ती तुझ्यासोबत आहेत त्यावरून तरी तू ती अडॉप्ट केली आहेत,असंच वाटतंय. केवळ आपल्या दोघांसाठी,हो नं!? कसं जमवलंस हे सगळं, तेही एकटीनेच, इतक्या लांब? ते तू करणारच म्हणा, तरीही, सांग ना!” एका मागोमाग एक, राजाने प्रश्नांची सरबत्तीच केली.
स्वतःला राजाच्या बहुपाशातून सोडवत राणी सावकाश मागे सरकली. चेहऱ्यावर तेच हास्य. आपला ओवरकोट काढून तिने एका टेबलावर ठेवला, स्टडी चे दार नीट बंद आहे का हे एकदा नजरेनेच जोखले. ती एका प्रशस्त खुर्चीत विसावली. राजाला आपल्या समोरच्या खुर्चीत बसण्यासाठी तिने हातानेच खुणावले. तिच्या एक-एक हालचालीला राजा सावकाश टिपत होता. त्याचबरोबर तिलाही न्याहाळत होता. काहीच तर बदल नव्हता राणीमध्ये, प्रवासाचा किंचित थकवा सोडल्यास, सारं काही तसंच, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध!
राणी बोलू लागली “ गोड आहेत नाही दोघंही. आवडली का तुला?”
राजा: “म्हणजे काय? अर्थात ..! They are adorable, but more than that I am pleasantly surprised…”
राणी राजाला मधेच तोडत हसली. हातानेच थांबण्याची खुण करून किंचित पुढे झुकून म्हणाली,
“तेच तर सांगतेय, पण तुझी मात्र मला अजूनही कमाल वाटते; ..Anyway.. सांगते ऐक! ही मुलं Adopted नाहीत, माझी आहेत ती, मी जन्म दिलाय त्यांना..!”
क्षणभर, आपण काय ऐकत आहोत हे राजाला समजलेच नाही. हे खरे आहे का, म्हणून त्याने राणीकडे पहिले, आणि मग मात्र राजा चपापला, ताड्कन उठून उभा राहीला. काय बोलावे, हेच त्याला कळत नव्हते. रागही अनावर होत होता. तो उभ्या-उभ्याच हाताच्या मुठी वळू लागला. त्याने एका जळजळीत नजरेनेच राणीला जाब विचारला.राणी अगदी निवांतपणे म्हणाली, “असा काय React होतोयस,भूत बघितल्या सारखा!? बैस, शांत खाली ” राणीच्या या वाक्यासरशी,कोणीतरी थोतरात मारावी, तसा तो गपकन खाली बसला. आता नजरेत जरा वरमला ,राणी काय सांगतेय हे प्राण कानात आणून ऐकू लागला!
“तुला आठवतं, तुझा निर्णय तू मला ऐकवला होतास, गणिका आपल्या महालात घेऊन येण्याचा, Surrogacy with some- what twist, आणि मनात हिय्या करूनच आला होतास कि मी होकारच दिला पाहिजे, नव्हे तर देईनच! बास, मीही होकार दिला, मन वाचलं मी तुझं.”
आता राणीच्या वाक्या-वाक्यात, विरोधात्मक छटा दिसू लागली.  
“अगदी लगबगीनं तू पुढच्या सगळ्या गोष्टी केल्यास, कदाचित आधीच ठरलं असेल सारं, But anyway ते बोलण्यात काय अर्थ..!
राणी अगदी सहजपणे, पण अगदी ठराविल्यासारखे बोलत होती.कदाचित हा प्रसंग तिने कित्येक वेळा मनोमन पहिला होता, आणि मनोमन, सगळ्या ओळी अगदी बोलून टाकल्या होत्या.
राजाकडे अगदी तुच्छ, तितकाच कोरडा, कटाक्ष टाकत ती म्हणाली..
“तुझ्या घाईलाही समजू शकते मी, अर्थात तुझ्या इच्छेला देखील. मुल हवंय, अगदी कसंही करून,पण हे नाही समजू शकले, कि ते तुला माझ्याशिवायही चालणार आहे. तुला केवळ मुलच हवंय..! त्या आनंदात, मी नसले तरीही तुला चालणार आहे. का नाही,नक्कीच. मीही हे मान्य करते की माझं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे याचाच अर्थ एकमेकांचा आनंद ही वाटून घ्यायचा. मग भलेही त्यात Personal सहभाग नसेल! पण मला काढून टाकण्याची, मुळापासून उपटून टाकण्याची इतकी घाई..!? का , कशासाठी..!?”
आता नकळत राणीचा आवाज चढला होता, स्वाभाविक रागाने ती किंचित थरथरत होती, पण अगदी काही क्षणच.शिताफीने तिने स्वतःला सावरले, ती पुढे बोलू लागली.
“दुसरं म्हणजे How did you assume that I have some technical fault, problem, in the entire process, while the medical reports were always excellent..! I really pity you..! खरंच...!! आणि मग हे मात्र मला सर्वात जास्त लागलं, तुझं याही बाबतीत मला गृहीत धरणं. बास आणि मी ठरवलं. जशी तुझी तयारी,तशीच अगदी तस्शीच माझीही तयारी केली.आजही अगदी स्पष्ट आठवतंय सारं, दिसतंय डोळ्यासमोर. मी ही एक फतवा काढला...”
राजा आता आश्चर्यमिश्रित कुतूहलाने ऐकू लागला.
“आपल्या राज्यातल्या , आणि हो, जवळपासच्या राज्ज्यातल्या देखील, उत्तमोत्तम तरुणांना बोलावण्यासाठी. फतव्यात Clearly लिहिलं होतं, Only true, and skilled womanizers are eligible. प्रेम बीम काही नको होतं मला ,कारण प्रेम तर मी केवळ तुझ्यावरच केलंय नं..! असो..! तर मग काय.. अगदी रांग लागली.सर्व जाती-धर्म, अगदी झाडून सगळे, आनंदाने आले. आजही Womanizer असणं ही बाब गर्वाने मिरवतात बरंका पुरुष मंडळी! मग त्यातल्याच काही जणांची निवड केली मी. सगळ्या कला आत्मसात असणं आवश्यकच, मला काय म्हणायचय हे कळतंय नं!?
राणीचे खोचक बोलणे राजाच्या जिव्हारी लागतं होते. तो गोरा-मोरा झाला होता. आता पुढचे ऐकवणार नाही, या मुळे अस्वस्थही झाला होता.तो उठून फेऱ्या मारू लागला, आणि बाहेर जाण्यासाठी वळणार तोच, राणी त्याला आडवी येऊन म्हणाली..
“बास फार काही नाही, थोडंसंच सांगायचं बाकी आहे, नाहीतर मला वाटत राहील, की मी तुझ्याशी खोटं बोलले म्हणून..काळजी नकोस करूस, रंगवून नाही सांगणार जास्त..!” पुन्हा एक खोचक, अचूक वार..! तिच्या या बोलण्याने तो जागच्या जागी खिळून उभा राहिला,भारावल्यासारखा,राजा पुढचे ऐकू लागला!
“हो! तर निवड केली मी, काही जणांची, अगदीच आठवून सांगायचं तर ६ जणांची..!” राणी स्वतःच्या नाखांकडे एकवार बघून स्वतःवरच खुश होत, पुढे म्हणाली, “तू विसरलास, हा महाल बांधताना आपल्या दालनाला आपण एक चोर दरवाजाही करून घेतला होता. खास तुझ्या आवडीच्या काही Role-plays साठी! मस्त कामी आला माझ्या. त्या दरवाजा मागच्या भुयारातून हे सहाही जण ये –जा करायचे.माझ्या दोन अति विश्वासू दासी, मला मदत करायच्या. आणि, आणि तो Piano  आठवतो, हो , तो मी नाही त्या सहा जणांपैकी माझा सर्वात लाडका Keep वाजवायचा माझ्यासाठी! अगदी माझ्यासारखा. हे सहाही जण माझ्या इशाऱ्यांवर, हुकुमावर नाचत असायचे नुसते. गम्मत बघ, इकडे थोड्याच दिवसात तूही तळमळायला लागलास..., बास अजून काय!  माझं मात्र काम झालं, काहीच महिन्यात, तरीही यातले काही युवक येतच राहिले, मला सदिच्छा भेटी देतच राहिले. मी मोहरून जायचे अगदी, फुलासारखी. त्यामुळे, मी अजूनच सुंदर दिसू लागले नाही,!? असो..!”
स्वतःत हरवल्यासारखी राणी सांगत होती, हसत होती, मध्येच गोष्ट रंगत होती,मधेच तिचे गाल आरक्त होत होते.
“हळू हळू मी जास्त वेळ दालनातच घालवू लागले, प्रणयक्रीडा-शिकू लागले, शिकवू लागले. आणि होवू नये तेच घडलं या पैकी एकाचं चक्क प्रेम जडलं नं माझ्यावर! मग मात्र मी योग्य आदर-सत्कार करून त्याची हकालपट्टी केली, पण त्याला तसं वाटलं सुद्धा नाही. अधे मध्ये तो भेटत राहिलाच म्हणा!
अगदी योग्य वेळी मी Onsite गेले..आणि पुढचं तर तुला माहीतच आहे..!”
राजा आवाक होऊन पाहत राहिला. त्या थंडगार दालनातही त्याला पुरता घाम फुटला होता.
राजाची नजर काही प्रश्नार्थक होण्याच्या आधीच राणी म्हणाली’
“हं आता पुढे मी कुठे राहिले, आणि काय..कसे याला काय अर्थ..!? सुखरूप, मुलांसोबत परत आले हे नक्की.! ए पण मनापसून Thanks हं, मला माझ्यातली मी शोधून दिल्याबद्दल! आज कळतंय मला काय गम्मत असते ते ..” ती मिश्कीलपणे राजाकडे पाहत होती, त्या नजरेत, द्वेष, दु;ख, फसवले गेल्याची भावना ,आणि सूड या सगळ्याच गोष्टी त्या विकृत आनंदाबरोबर नाचत राहिल्या..!
“हो, यातून एक मोठ्ठी गोष्टही जगासमोर आली, की राजाला शेवटी स्वतःच्या राणी पासूनच मुल झालं! काय पण राजाचं प्रेम..!
कोणीतरी डोक्यात अचानक घाव घालावा तसा राजा, मट्कन खाली बसला. राणी विजयी मुद्रेने बाहेर आली, दासींना तिचे दालन उघडायला सांगून,अर्थात,पूर्ण एकांत मागून!
..............................................................................................................................................

राणीच्या महालातल्या मोठ्या आरशाचं,त्याच्या जागी असलेल्या चोर दरवाजाचं, आणि पिआनोचं गुपित आठवून, तिच्या दासी मात्र मनोमन हासत राहिल्या. राणीने राजाचे अस्तित्व तिच्या दालनातूनच नव्हे, तर तिच्या आयुष्यातूनच वजा केले होते; कधीच, हे मागचे काही प्रसंग आठवून दासींच्या लक्षात आले.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
आता राजकुमार-राजकुमारी, महालात भरपूर खेळतात, मज्जा मस्ती करतात. राजा-राणी अजूनही एकत्रच नांदतात. राजकुमारी काळी, तर राजपुत्र गोरा, राजाला आणि कोणालाच हे कोडे उमगत नाही, आणि राणीच्या दालनातील, आरसा मात्र अजून काही चोऱ्या सांगत नाही..!!!
                      डॉ.उर्जिता कुलकर्णी.  
राणीचे मनोगत..
मला नाही माहित मी आनंदी आहे, दुःखी आहे..
मी त्याचं कार्य साधलं आहे..?
त्याचं..त्या प्रेम म्हणवणाऱ्या सापळ्याचं..?
युगन्तरे बदलली तरीही
न मोडणाऱ्या खोडीचं?
नाही.. नक्कीच नाही..
मी माझं माणूसपण जाहीर केलंय..
क्रूर, निष्ठुर, म्हण नाहीतर कुलटा
माझं मात्र सांगून झालय..
कोणाला तेही माहित नाही...!
मला नाही माहित.. हे योग्य आहे कि अयोग्य..
समाज नावाचं कोंडाळं
हिणवून बघेल नक्कीच..
त्याचं टप्पल मारून, दात विचकून झालंय..
शब्दांच्या अर्थांचं मात्र कित्येक पट जगून झालंय..!