Sunday, 17 April 2016

मला नाद लागतो जगण्यासाठी ...!

मला नाद लागतो जगण्यासाठी ...!
मला नाद लागतो जगण्यासाठी ... रोज वेगळा, मलाही न कळणारा.
पण म्हणून काय झालं?
जरी ठरलो मी बंडखोर, तरी माझं काय वाईट झालं..?
बंडखोरच असेल, पण ते माझा स्वत्व. माझ्या स्वतःत देखील न सापडणार अस्तित्व..
हे अस्तित्व, हि अस्मिता मला लागतेच....
मी स्त्री, किंवा मी पुरुष, किंवा तृतीयपंथी – अजिबात नाही सांगत..
मी बोलतोय माझ्या असण्याचे निकष..!
हि तर माझ्या भावनांची बोली..

मी नाही मानत, बघत, तोलत, समजत, नाती जी बांधली जातात,
नात्यांपेक्षा सजाच त्यातून मांडल्या जातात,
कितीतरी आयुष्यं भरडली जातात..
आणि त्यावर टाळ्या पिटणारे तर कोणाला चुकतात..?

वेगळं आहे माझं जग..
नाही रमत मी कर्मकांडात न रहाट-गाडग्यात,
रमत नाही कोणत्याही कळपात..!

कळपात एकच कोकरू असत..!
थिल्लर , नुसतं मस्तीत उड्या मारतं..
कधी दगडाआड तर कधी गवाताआड लपतं..
काठी पडली पाठीत की पुन्हा कळपातच चालू लागतं..!

माझ्याही पाठी आणि पाठीत असंख्य काठया..
पण आता फिकीर नाही.
का थिल्लर म्हणायचं त्याला ?
त्याचं मनस्वी असणं; का नाकारायचं त्याला ?
आपल्याच धुंदीत वाट तुडवीणं,
पण कळपात मन कधीच न रमणं!
काय होणार ..?
बाहेर पडतं एक दिवस .........................................

माझंही तेच .........................................................

मी मुक्त, का? कशासाठी? कोणासाठी?
पण हे प्रश्नच पडत नाहीत. किंबहुना छे..! ते अस्तित्वातच नाहीत ..!
पडले तरी हाती काही गवसेल शक्यच नाही.
मग कशाला फंदात पडा...
रडा-रड, आरडा-ओरड करा..
त्यापेक्षा मुक्त जगा... अगदी मुक्त ...!
कसं ?
असं.....

मुक्तपणे भरभरून द्यायचं, आणि हो घ्यायचंही..
हातानेच का ?
मनाने, शरीराने, जाणीवांनी आणि प्रत्येक क्षणांनी!
न्याहाळायचं, अनुभवायचं, आपलंसं नाही झालं—पुढे जायचं..!

बर; हे माझे नियम बरंका...!
म्हणजे माझ्यापुरतेच हं..!
जग वेड होईल, मी असा आशीर्वाद दिला आणि माझ्यासारखी अजून माणसे जन्माला आली तर ..
आली तर आली, मनाप्रमाणे जगली तर..?
चुकून या आडवळणाला लागली तर?
पंख नसतानाही असल्यागत भरारी घेऊन दमलीच तर.....?!

कळपांचंच जग .............. कळपांचेच नियम......

मला मात्र नाद लागतो ..!
कळपांचं मला माहित नाही,
इथे पुढच्या क्षणाची कल्पना नाही!
गणित, भुमिती, वजाबाकी माझी काही सलगी नाही..
पण मी खूप गुदमरणं सहन केलं..
वेळ, श्रम आणि मी सारं खर्ची पडलं..
म्हणून मला कदाचित मरण आलं..??????????
---------------------------------------------------------------
            छे.......!!!!!!!
हा तर केवळ पहिला अंक-
नाटकाच्या एकूण पसाऱ्यातला..
काहीच काम नाही, म्हणून कळसूत्री दिसण्यातला!
कळसुत्रीची कळ,दोरा सारं काही पणाला लावून कळसूत्री नाचली, हसली ..
आता...
आता अंक बदलला..!
कळसूत्री सूत्रधार झाली..!
काळ्या-कभिन्न प्रकाशातून बोलू लागली...
मोकळेपणाने शब्द घुमू लागले..
पात्रांचे अंगविक्षेप आवरले!
सूत्रधाराला कधी फिकीरच नव्हती याची ... कोणाचीच..
पहिल्या अंकात मिरवणाऱ्यांची,
कळपात अतीशय योग्यतेने मान-मरातब जपणाऱ्यांची ..!

कळसूत्री,सूत्रधार,मी,सारे मुक्त..
मला आज नाहीये इच्छा या अंकात रमण्याची........

हा आवाज माझा आहे?
नक्की?
मग पात्रांना एक प्रश्न माझा आणि उत्तरही...
कोण नाचावतंय? मी ????
चूक...!!!
तुमचं अंतरमन....!
तुमच्या परीकथेचं रुपांतर आता शेक्सपियरच्या हॅम्लेट मध्ये किंवा जि. एं. च्या कथेत झालंय..!
ज्याला न जसं हवं तसं शीर्षक..
ना जसा हवा तसा सुखांत ..!!!!

मी- मी, कळसूत्री ,सूत्रधार, आवाज काहीच नाही...
मी वावर आहे
दुरून पात्रांची अवस्था, एकटा प्रेक्षक म्हणून बघतोय..
आणि ती बघून कधी मनसोक्त हसून, तर कधी निर्विकार-पणे पुढे जातोय..
निर्विकार – हो तोही एक विकार गरजेचाच
महत्वाचा
कदाचित जास्त जवळचा..!
आणखी कोण इतक्या सहज जवळ करेल मुक्त असण्याला..!!!

मुक्त म्हणजे नेमकं माहित नाही..
पाण्यासारखं चालणं म्हणतात ..
पण पंचतत्वांसारखं खरंतर उन्मत्त तरीही शांत – निद्रिस्त!
आणि अगदीच अनाकलनीय!
पण तीच तर गम्मत आहे..!
आणि मी शरणागत आहे..!
मुक्त असणं शाप आहे म्हणतात ..
तर मी आनंदाने शापित आहे ... शापित आहे..!!!

हो मला नाद लागतो जगण्यासाठी ..!!!
                    उर्जिता..(उर्जा)